ना.नितेश राणे यांना संपर्क मंत्री म्हणून सोपविली जबाबदारी…

रत्नागिरी : प्रतिनिधी : दि 0६

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार आहे.
प्रदेश भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय सदस्यता अभियान अंतर्गत मुंबईत श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात प्रदेश कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, सरचिटणीस माधवी नाईक, सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस विजय चौधरी तसेच राज्यातील सर्व मंत्री, आमदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी राज्यातील भाजपच्या संपर्क मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. ज्या जिल्ह्यात भाजपाचा आमदार किंवा मंत्री नाही त्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून भाजपने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांवर त्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे.