पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश;सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. तसेच या महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मंत्री हसन मुश्रीफ, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते ,सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री मुश्रिफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. ही सर्व पदे येत्या ८ महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी, विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी आणि करावयाच्या सुधारणा आणि पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी, नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.