तेजस एक्स्प्रेसच्या विद्युत इंजिनमध्ये करबुडे येथे तांत्रिक बिघाड …

रत्नागिरी : दि २२

मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान दरम्यान:धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या विद्युत इंजिनमध्ये करबुडे येथे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या मार्गावरील सहा ते सात गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. इंजिन बिघाड झालेली तेजस एक्स्प्रेसनंतर डिझेल इंजिन जोडून घटनास्थळापासून पुढे मार्गस्थ करण्यात आली.

रेल्वे मार्गे धावणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी मुंबईतून गोव्याच्या दिशेने धावत असताना उक्षी ते रत्नागिरी दरम्यान करबुडे येथे विद्युत इंजिनमध्ये अचानक बिघाड निर्माण झाला.याची माहिती तातडीने ‘कोरे’ नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच रत्नागिरी येथून ईमर्जन्सी व्हॅन करबुडेकडे रवाना झाली. रत्नागिरी येथून पर्यायी डिझेल इंजिन पाठवून इंजिन दोष निर्माण झालेली तेजस रत्नागिरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.दरम्यान, तेजस एक्स्प्रेस मुंबई – मडगाव मार्गावर धावत असतानाच अचानक विद्युत इंजिन बिघडल्याने ही गाडी तब्बल तासभर रखडली. याचबरोबर यावेळी मार्गावरुन धावणाऱ्या अप मांडवी एक्स्प्रेससह सहा ते सात एक्सप्रेस गाड्यांना विलंबाचा फटका बसला. या घटनेमुळे डाऊन मार्गावरील तेजस एक्स्प्रेस जवळपास एक तास मडगावला उशिरा पोहचली.