कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालगतच्या नेरुर – वाघचौडी व गोंधयाळे वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमी आणि जोड रस्ता या मागणीसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत. या दोन्ही वाडीची लोकसंख्या सुमारे दीड हजार एवढी आहे. स्मशानभूमी मागणीसाठी गेल्या काही वर्षांत 20 हून जास्त उपोषणे ग्रामस्थांनी केली. मात्र एमआयडीसी प्रशासनाने याची अद्यापही दखल घेतलेली नाही. आता ग्रामस्थांनी पुन्हा येत्या 26 जानेवारीला आर या पारची लढाई लढायचे ठरविले आहे. स्मशानभूमी आणि जोडरस्ता व्हावा यासाठी आमरण उपोषण आणि तरीही काही झाले नाही तर थेट मागितलेल्या भूखंडावरच आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थ श्याम गावडे, मंगेश राऊत यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.










