कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसीपर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्यावर तातडीने दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सदर रस्त्याचे काम संबंधित ठेकेदार कंपनीमार्फत पूर्ण करण्यात आले असून, रस्त्यावर रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक बसविणे आवश्यक आहे. यापूर्वीही याबाबत संबंधित विभागाकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काही दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने या मार्गावर विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढणार आहे. रस्त्यावर आवश्यक सुरक्षा सुविधा नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चार दिवसांच्या आत या रस्त्यावर दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा एमआयडीसी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही श्री. अभिषेक गावडे यांनी दिला आहे.
या मागणीमुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित विभाग याबाबत काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












