उद्योगजकांसाठी नवा प्रस्ताव बनवा; आ.निलेश राणे

कुडाळ प्रतिनिधी ,

कुडाळ एमआयडीसीमध्ये असलेले आजारी उद्योगांना नवसंजीवनी आणि नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी पर्यायी जागा मिळाली नाही तर मंजूर असलेल्या जागेवर हा प्रकल्प करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केले.
कुडाळ एमआयडीसी येथे एमआयडीसीच्या विषयांच्या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी बैठक घेतली. यावेळी एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी वंदना खरमाळे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, नकुल पार्सेकर, राजन नाईक, श्री प्रभू, श्री तेरसे, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर, एमआयडीसी विद्युत विभागाचे उपअभियंता प्रेरणा नागवेकर, क्षेत्र व्यवस्थापक संजय कसबे, महावितरण कंपनीचे प्रशासन विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, संचालक निलेश तेंडोलकर, रुपेश पावसकर, नगरसेवक विलास कुडाळकर, संध्या तेरसे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सुरुवातीला आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या सद्य परिस्थितीवर विचारणा केली यामध्ये एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी सुद्धा परिस्थिती सांगितली. यामध्ये अनेक उद्योग आजारी आहेत. या उद्योगांना पुनर्जीवित करण्याची गरज आहे. तसेच या ठिकाणी विद्युत पुरवठ्याचा मोठा सामना उद्योजकांना करावा लागतो. त्यासाठी सबस्टेशन व्हावे म्हणून मागणी केली सबस्टेशनला जागा सुद्धा देण्यात आली आहे. मात्र हे सबस्टेशन होत नाही ते करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली या सबस्टेशनमध्ये काय त्रुटी दूर करून याबाबतचा अहवाल देण्याबाबत आमदार निलेश राणे यांनी सूचना दिल्या.