सिंधुदुर्गच्या पाणीप्रश्नांवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट हस्तक्षेप; मंत्रालयातून कडक निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जल जीवन मिशनची कामे, प्रलंबित योजना आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेऊन प्रशासनाला स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी त्यांनी प्रभावी नियोजनावर भर देत कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
बैठकीत पूर्ण झालेल्या तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विहिरींची कामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक वापर करावा तसेच सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री राणे यांनी दिल्या.
यावर्षी पावसाला उशीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा, बोअरवेल आणि इतर आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जल जीवन मिशनची उद्दिष्टे शासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण व्हावीत आणि सिंधुदुर्ग जिल्हा पाणीपुरवठ्याच्या बाबतीत आदर्श ठरावा, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष घातल्याचे या बैठकीतून अधोरेखित झाले.
या बैठकीस आमदार दीपक केसरकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
“सिंधुदुर्गातील प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पाणी पोहोचविण्याचा निर्धारः पालकमंत्री नितेश राणे यांची प्रशासनाला कार्यक्षमतेची नवी दिशा!”