वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रशासन अलर्ट; पालकमंत्र्यांची अधिकाऱ्यांना ताकीद

मुंबई : सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी आवश्यक सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीत दुरुस्ती व देखभाल कामांचे नियोजन करताना पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देत महावितरण प्रशासन आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय राखण्यावर भर देण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरक्षित आणि अखंड राहावा यासाठी विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
या बैठकीस आमदार दीपक केसरकर प्रत्यक्ष उपस्थित होते, तर आमदार निलेश राणे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.