पेट्रोल टंचाईचा फटका! सिंधुदुर्गात मागणी ५० टक्क्यांनी वाढली

सिंधुदुर्ग : एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्धामुळे कच्च्या तेलाची थांबलेली आयात आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले पेट्रोल काटकसरीचे आवाहन या पार्श्वभूमीवर अनेक पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक पेट्रोल पंप आजही अधूनमधून ‘पेट्रोल संपले आहे’ असा फलक झळकवतात. यामागे अनेक कारणे असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात ५० टक्के पर्यंत पेट्रोलच्या मागणीत वाढ झाली आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
पेट्रोल टंचाई गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. पेट्रोलपंपावर १२ हजार लिटरचा टैंकर आला की तो काही तासात संपतो. जो टैंकर संपण्यासाठी चार ते पाच दिवस लागायचे अशा पेट्रोलपंपाजवळही चार-पाच तासात पेट्रोल संपते अशी स्थिती आहे. या स्थितीमध्ये मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी फारसा फरक पडलेला नाही. अजूनही कुठल्या ना कुठल्या पेट्रोल पंपावर ‘पेट्रोल संपले आहे’ असा फलक लागतो. ही टंचाई कधी संपणार? असाही प्रश्न वाहनचालकांसमोर आहे. ही स्थिती असताना पेट्रोलचा दर गेल्या दहा-बारा दिवसात तब्बल ७ रुपयांपर्यंत वाढला आहे. एका बाजुला पेट्रोल न मिळणे आणि दुसऱ्या बाजुला दर वाढणे असे दुहेरी संकट विशेषतः रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि इतर व्यवसायिक वाहनचालकांसमोर आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो आहे, परंतु तो फारच अल्प स्वरूपाचा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६१ पेट्रोलपंप आहेत. त्यापैकी दोन सध्या बंद आहेत. ५९ पेट्रोलपंपांनी गेला दीड महिना पेट्रोल पुरविण्याची कसरत केली आहे. जो पेट्रोल पुरवठा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिरज डेपोकडून होत होता तितकाच पुरवठा गेल्या दीड महिन्याच्या काळातही सुरूच होता. मात्र युद्धामुळे पेट्रोल टंचाई निर्माण होणार अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी खबरदारी म्हणून पेट्रोलचा साठा करून ठेवला. त्या वाहनचालकाला दिवसाला एक लिटर पेट्रोल लागत होते, त्याने पाच-पाच लिटर पेट्रोल भरून ठेवले. व्यवसायिक वाहनधारकांनीही आपल्या व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून अधिकचे पेट्रोल भरून ठेवले.
यावर्षी का कुणास ठाऊक परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात हजारो नाही तर लाखभर पर्यटक येऊन गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले होते. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तुलनेने या काळात कोकणातील तापमान कमी होते. त्यामुळे पर्यटकांनी उन्हाळी सुटीत सिंधुदुर्ग गाठले. मालवण, वेंगुर्ले, देवगड या भागात तर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली होती. या पर्यटकांनीसुद्धा आपल्या गाड्या पेट्रोलपंपावरील रांगेत उभ्या केल्या. पर्यटकांच्या वाहनांसाठी पेट्रोलची मागणी अचानक वाढली. ज्या दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागात पेट्रोल टंचाई नव्हती त्या दिवसांमध्ये कोकणात ती होती, या मागील पर्यटकांची वाढती संख्या हेच कारण होते. त्यात पुन्हा यावर्षी चाकरमानीही आपल्या गावी मोठ्या प्रमाणात उतरले होते.
बाजारपेठांमध्ये मुंबईकर चाकरमान्यांची गर्दी हे प्रमाण दर्शवित होते. यावर्षी परीक्षा लवकर संपल्यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे आला. यावर्षी फारसा अवकाळी पाऊस पडला नसल्याने वातावरण तसे मोकळे होते. त्याशिवाय कोकण रेल्वेने अनेक गाड्या सोडल्या होत्या.
एकच ट्रॅक असल्यामुळे आणि त्यावरील गाड्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वे गाड्या उशिराने धावत होत्या, हे खरे असले तरी चाकरमान्यांची गर्दी काही थांबली नव्हती. रेल्वेगाडीमध्ये निभाव लागत नाही हे लक्षात येताच हजारो चाकरमान्यांनी आपल्या चारचाकी गाड्या घेवून गाव गाठला. या गाड्याही पेट्रोलपंपांवरील रांगेत उभ्या होत्या