पुतळा प्रकरणी दोषींवर कारवाई ऐवजी मदत-हुसेन दलवाई

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनुभव नसलेल्या, ज्ञान नसलेल्या आणि महाराजांप्रति श्रद्धा नसलेल्या माणसानी उभारला.यामुळेच तो कोसळला. पुतळा वाऱ्याने पडावा इतके या पुतळ्याचे काम तकलादू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सगळी कामे तकलादू होत आहेत. पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होण्या ऐवजी त्यांना मदत करण्याचे काम होत आहे, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे माजी खासदार व राज्याचे माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी करत पुतळा दुर्घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.माजी खा. हुसेन दलवाई यांनी शनिवारी मालवण भेटी दरम्यान राजकोट किल्ला येथे भेट देऊन पुतळा दुर्घटनेची तसें सध्या सुरु असलेल्या नवीन पुतळा उभारणीच्या कामाची माहिती घेतली. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे उपस्थित होते. हुसेन दलवाई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनीच भारतीय नौदलाची स्थापना केली. याची जाण ठेवूनच नौदलाने राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारला. मात्र दुर्दैवाने हा पुतळा कोसळला.पुतळ्याच्या ठीकऱ्या उडाल्या इतके तकलादू काम झाले होते. महाराजांच्या पुतळ्याची कुचेष्टा केली गेली. मराठी माणसाला वेदना देणारी ही घटना घडली.