मालवण : मालवण शहरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून शहर व परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे. यामुळे शहरांत दाखल होणाऱ्या पर्यटक व स्थानिकांना देखील फार मोठा त्रास सहन करावा लागत असून पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी मालवण पोलिसांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा जागतिक पर्यटनाचे केंद्र असून जिल्ह्यात मालवण तालुका हा पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जातो. आता यावर्षीचा पर्यटन हंगाम अखेरच्या टप्प्यात असून सध्या सुट्टीच्या कालावधीत पर्यटकांच्या संख्येने गर्दीचा उच्चांक गाठला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक हे आपल्या खाजगी तसेच सार्वजनिक वाहनातून मालवण येथे दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे सुट्टी असल्याने याच कालावधीत मोठ्या प्रमाणात चाकरमानी देखील आपापल्या गावी आलेले आहेत. त्यामुळे मालवण शहर तसेच प्रामुख्याने मालवण तारकर्ली देवबाग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
पर्यटक तसेच स्थानिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत असून त्यामुळे वेळेचा अपव्यय व इंधनाचाही नाहक खर्च होत आहे. मालवणात पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी पर्यटक आपली वाहने चुकीच्या पद्धतीने पार्किंग करतात. त्यामुळेही अनेकदा वाहतूक कोंडी होते. यावर उपाययोजना म्हणून आपल्या मार्फत भरड नाका, बाजारपेठेतील सकपाळ नाका, बंदर जेटी मार्ग सारख्या प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलीस नियुक्त करावेत तसेच मोटरसायकल द्वारे फिरते वाहतूक पोलीस तैनात करावे. जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या निवारून नागरिकांना दिलासा मिळेल. तरी आमच्या या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष सागर जाधव, अभिजित मेधर, गुरु तोडणकर आदी उपस्थित होते.












