कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य पाट तलावाच्या सुशोभीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या कामाचे दिमाखात भूमिपूजन करण्यात आले. २०२५-२६ या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, या प्रकल्पासाठी ५ कोटींचा प्रारंभिक निधी मंजूर करण्यात आला आहे. “हा तलाव जागतिक दर्जाचा करणार असून दिलेला शब्द पाळणारच,” अशी ग्वाही आमदार राणे यांनी यावेळी दिली.
गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या या कामाबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, “हे काम कोणामुळे रखडले हे आता महत्त्वाचे नाही. भूतकाळात काय झाले त्यापेक्षा भविष्यकाळात हा प्रकल्प पूर्ण करणे हे आमचे लक्ष्य आहे. ५ कोटी हा केवळ सुरुवातीचा निधी आहे, या प्रकल्पाला जागतिक दर्जाचे स्वरूप देण्यासाठी आवश्यकतेनुसार आणखी वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाईल.”
विकासकामांचा धडाका
केवळ तलावच नव्हे तर संपूर्ण परिसराचा विकास करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्थानिक प्रशासनाला आवाहन केले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही विकासकामांच्या याद्या असतील, त्या त्वरित माझ्याकडे सुपूर्द कराव्यात. ती सर्व कामे मार्गी लावून जनतेला दिलासा दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाट तलावाच्या या सुशोभीकरणामुळे परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



