मुंबई : नंदुरबारच्या नवापूर येथे पसरलेला बर्ड फ्लूमुळे आत्तापर्यंत १२ पोल्ट्री फार्ममधील पक्षी मारण्याची वेळ आली असून ३.८९ लाख कोंबड्या तसेच, २१ लाख अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. काही कोंबड्यांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले होते. तेव्हापासून ८ मेपर्यंत प्रशासनाकडून दिवसरात्र यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच, शेजारील राज्यांनाही याविषयीची माहिती देण्यात आली असून परिसरातील पोल्ट्री फार्ममालकांना याविषयी खबरदारी राखण्यास सांगण्यात आले आहे.
नवापूरमधील डायमंड पोल्ट्री फार्मच्या ४० हजार कोंबड्यांमधील ७० कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करून लक्षणांनुसार इतर कोंबड्यांवर औषधोपचार केले. परंतु तरीही पक्षी मृत होण्याचे प्रकार थांबले नाही. दरम्यान इतर तीन फार्मवरही पक्षी मृतावस्थेत आढळले.
एकूण १.७१ लाख कोंबड्या असलेल्या या फार्मवरील १,२८९ कोंबड्या अचानक मृतावस्थेत आढळल्याने रोग अन्वेषण विभाग, पुणे येथून बर्ड फ्लूच्या निदानासाठी राष्ट्रीय उच्चसुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ (मध्य प्रदेश) येथे २७ एप्रिल रोजी नमुने पाठवले. या नमुन्यांनुसार हा बर्ड फ्लूचाच प्रकार असल्यावर २९ एप्रिल रोजी स्पष्ट झाले. त्यानंतर एक किलोमीटरच्या परिसरातील २.४७लाख कोंबड्या, ९.२७ लाख अंडी आणि २.८६ लाख किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले. परंतु, ४ मे रोजी परिसरातील पक्ष्यांचे नमुने पुन्हा पाठविण्यात आले. त्यात आणखी चार पोल्ट्रींमध्ये संसर्ग आढळून आला. त्यामुळे आणखी ठिकाणच्या कोंबड्या आणि अंड्यांनी विल्हेवाट लावण्यात आली. ८ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १२ पोल्ट्री फार्ममध्ये एकूण संसर्ग झाला असून त्यातून ३.८९ लाख कोंबड्या, २१.६१ लाख अंडी आणि ४.९९ लाख किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. तर, परिसरातील फार्मवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
एकीकडे रोगाचा संसर्ग मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, पोल्ट्रीमालकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीही पशुसंवर्धन विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आत्तापर्यंत झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर विभागाने एकूण नऊ कोटी रुपयांची आवश्यकता लागणार असल्याचा अंदाज वर्तवला असून त्यापैकी ५० टक्के म्हणजे ४.५० कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच, राज्य सरकारकडून मदत मिळावी यासाठीही विभागाने प्रस्ताव सादर केला आहे. सद्यस्थितीत ज्या फार्ममध्ये हा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले तेथील पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. परिसरातील इतर फार्मवरही पशुवैद्यकीय अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनीही घाबरून जाण्याचीही गरज नाही. तसेच, अफवांवरही विश्वास ठेवू नये.- डॉ. शीतलकुमार मुकणे, अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग












