जिल्ह्यातील वाढते अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्येत पुढील वर्षभरात घट झाली पाहिजे, या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने नियमांचे काटेकोरपणे पालन करून बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करावी, असे आवाहन मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना केले.
ना. राणे म्हणाले, रस्ता सुरक्षा मोहीम सप्ताहापुरती न रहाता ती सातत्याने कटाक्षाने व नियमाला धरून राबवली पाहिजे. जेणेकरून पुढील वर्षभरात जिल्ह्यातील रस्ते अपघातांचा आलेख घटलेला असेल. ओसरगाव टोल नाका सुरू नसताना तेथे बेकायदेशीर टोल आकारणी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत परिवहन विभाग आणि पोलीसांनी गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करताना त्याचा त्रास नियम पाळणारे पर्यटक व अन्य वाहन चालकांना होणार नाही, याचीही काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी आरटीओ व पोलिस अधिकाऱ्यांना केली.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे प्रमाणेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अॅम्बुलन्स सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असे, ना. राणे म्हणाले. जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले.










