कुडाळमध्ये ‘मोफत वैकुंठ रथ सेवा’ होणार सुरू

आ. निलेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण

कुडाळ : माणुसकीचा हात देत अंतिम प्रवास अधिक सन्मानाने पार पडावा या उद्देशाने कुडाळ शहरात मोफत ‘वैकुंठ रथ सेवा’ सुरू करण्यात येत आहे. या सेवेचे लवकरच लोकार्पण निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर मृतदेह घरी किंवा स्मशानभूमीत नेण्यासाठी खासगी वाहनांकडून आकारले जाणारे अवास्तव भाडे अनेकांसाठी परवडणारे नसते. या पार्श्वभूमीवर ही मोफत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दु:खाच्या प्रसंगी आर्थिक ओझे कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही सेवा कुडाळ शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. कुडाळातील प्रसिद्ध व्यापारी स्व. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबवण्यात येत असून, समाजाप्रती बांधिलकी जपत ही सेवा सुरू करण्यात येत आहे.

यापूर्वीही वातानुकूलित शवपेटीची मोफत सेवा गेली ८ वर्षे सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता कुडाळमध्ये वैकुंठ रथ सेवा सुरू होत असल्याने, कणकवली व सावंतवाडीप्रमाणेच येथेही अंतिम प्रवास अधिक सन्मानाने पार पडणार असल्याचे सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे समाजात माणुसकीचा संदेश देत गरजू नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे.