नववर्षाची भक्तीमय वातावरणाने सुरुवात, मंदिरात भाविकांची मांदियाळी

मुंबई: नवीन वर्षाची सुरुवात आनंद, आशा आणि सकारात्मकतेने व्हावी या भावनेतून देशभरातील लाखो भाविकांनी पहिल्याच दिवशी मंदिरांकडे धाव घेतली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी देवदर्शन घेण्याची परंपरा अजूनही तितकीच जिवंत असल्याचे चित्र आज पाहायला मिळतंय.
पहाटेपासूनच विविध धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी वाढू लागली असून मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भरून गेलं आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासून गणरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नवीन वर्ष सुखाचे, आरोग्याचे आणि यशाचे जावे, यासाठी भाविकांनी बाप्पाकडे प्रार्थना केली. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने भाविकांची गर्दी दरवर्षी भरपूर असते. त्यामुळे, दर्शनासाठी पूर्व तयारी सुरक्षा यंत्रणाआधीच तैनात होत्या तर दर्शनादरम्यान शिस्तबद्ध रांगा, सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांचा संयम पाहायला मिळाला.

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती. साईनामाचा जयघोष मंदिर परिसरात घुमत होता. पहाटेच्या काकड आरतीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या चरणी करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून भाविक शिर्डीत दाखल झाले होते.

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही भक्तांची प्रचंड गर्दी झाली. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते. स्वयंसेवक आणि प्रशासनाकडून भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी नियोजन करण्यात आले होते. गणपती बाप्पाच्या दर्शनाने वर्षाची सुरुवात करण्याचा उत्साह भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही नववर्षाच्या दिवशी भाविकांचा ओघ वाढला. महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. अनेकांनी नवीन वर्षासाठी संकल्प करत देवीकडे सुख, शांती आणि समाधानाची प्रार्थना केली.

देशातील इतर प्रमुख धार्मिक स्थळांवरही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. पुरी येथील जगन्नाथ मंदिर आणि वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. तर उज्जैन आणि वाराणसीसारख्या ठिकाणी सुद्धा भाविकांची वाढती गर्दी पाहायला मिळाली.
भाविकांच्या मते, नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने केल्यास मनाला शांती मिळते आणि वर्षभर सकारात्मकता टिकून राहते. स्वतः सह कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी सुख-समृद्धीची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात येत असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. कोकणशाही मुंबई