कणकवलीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज ; २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात

कणकवली : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणीसाठी टेबलची रचना व मतमोजणीची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. १७ प्रभागांची ५ टेबलवर ४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी सकाळी १० वाजता सुरु होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली आहे.

कणकवली तहसीलदार कार्यालयात गुरुवारी मतमोजणीच्या निमित्ताने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक तेजस नलवडे व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियोजन बैठक झाली. यामध्ये मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचा-यांचे नियोजन आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासाठी ३० निवडणूक अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच पोलीस अधिकारी , कर्मचारी , होमगार्ड बंदोबस्तासाठी असणार आहेत. शहरविकास आघाडी व भाजपा या दोन्ही पक्षांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी २ जागा निश्चित केल्या जाणार आहे. जेणेकरुन कायदा व सुव्यवस्था होईल.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे त्याचप्रमाणे मतमोजणी देखील शांततेत पार पडली पाहिजे , असे नियोजन करत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले आहे. कोकणशाही कणकवली