पिंगुळी राऊळ महाराज मठात चोरी; ५ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

कुडाळ, पिंगुळी येथील परमपूज्य संत राऊळ महाराज मठात व अण्णा महाराज मंदिरात चोरी करत अज्ञातांनी तब्बल १३ किलो चांदीसह ५.३८ लाखाच्या ऐवज लंपास केला आहे. यात राऊळ महाराज समाधी मंदिरातून बाबांची चांदीची मूर्ती, पादुका, दत्त मूर्ती आणि चांदीचे ताट तसेच दोन्ही मंदिरातल्या २० हजार रुपये किमतीच्या फंड पेट्या चोरीला गेल्या आहेत. यात एकूण ५ लाख ३८ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. दरम्यान हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून चार चोरटे दिसत आहे. दरम्यान संस्थानचे उप कार्याध्यक्ष दशरथ राऊळ यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या महितीनुसार २.४९ ते ३ या दरम्यान हि चोरी झाली. संत राऊळ महाराज समाधी मंदिराचा औदुंबराकडचा दरवाजा नादुरुस्त असल्याने तो चोरट्यांनी जोर लावून ढकलल्यावर लगेच उघडला. त्यांनतर चोरटे समाधी जवळ गेले समाधी वरची २ फूट उंचीची ६ किलो ९०० ग्रम वजनाची एक लाख रुपये किंमत असलेली मूर्ती, इथेच असलेली स्टीलची दहा हजार रुपये किमतीची फंडपेटी, जवळच असलेले ५ किमतीचे चांदीचे ताट चोरले. त्यांनतर त्यांनी आपला मोर्चा अण्णा महाराज मंदिराकडे वळविला. त्या मंदिराच कुलूप तोडून आत प्रवेश केला त्या मंदिरातून ३ लाख ९८ हजार रुपये किमतीच्या ४ किलो ९९० ग्राम वजनाच्या चांदीच्या पादुका, १० हजार रुपये किमतीची लाकडी फंड पेटी आणि दत्त महाराजांची अर्था किलो वजनाची सुमरे ५ हजार रुपये किमतीची मूर्ती चोरली. या दोन्ही फंडपेट्या मात्र अण्णा महाराज मंदिराच्या मागच्या बाजूला फोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यातले पैसे काढून घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. त्या दरम्यान काही पैसे देखील तिथे खाली पडलेले सापडले.दरम्यान हे चोरटे अण्णा महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागून गडग्यावरून उडी मारून आले असावेत. तिथला एक सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी हलवला. त्यानंतर ते चोरी करून त्याच मार्गाने पसार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जातोय. आज श्वान पथक सुद्धा घटना स्थळी आल होत. श्वानाला फंड पेटीचा वास दिला असता श्वान मागे असलेल्या रेल्वे ट्रॅक पर्यंत जाऊन घुटमळला त्यावरून चोरट्यांनी ट्रॅक पलीकडच्या रस्त्यावर एखाद वाहन उभ करून ठेवल असाव आणि त्यातून नंतर ते फरार झाले असावेत असा संशय आहे. दरम्यान ठसे तज्ञांनी सुद्धा फंड पेटी वरचे वगैरे ठसे घेतले आहेत.
चोरटे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. संत राऊळ महाराज मंदिरात चोरी झाली तेव्हा मंदिराचे पुजारी दिनेश ठाकूर हे त्याच मंदिरात झोपले होते. पण त्यांना याची जराही चाहूल लागू न देता चोरटयांनी शिताफीने चोरी केली. सकाळी दिनेश ठाकूर जेव्हा पूजा करण्यासाठी उठले आणि जेव्हा बाबांची मूर्ती दिसली नाही तेव्हा त्यांनी दशरथ राऊळ याना याची कल्पना दिली. एकंदरीतच एका प्रसिद्ध ठिकाणी सीसीटीव्ही सुरु असताना अवघ्या काही मिनिटात हि चोरी केल्यानं यापूर्वी चोरट्यांनी रेकी केली असल्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. चोरी करण्याच्या पद्धतीवरून चोरटे सराईत असून लवकरच सापडतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.