उद्योग मंत्री उदय सामंत रुग्णालयात दाखल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली उदय सामंतांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्यात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. हे हिवाळी अधिवेशन पंरपरेनुसार नागपूरला पार पडलं. उदय सामंत हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सक्रीय सहभाग घेतला होता. पण शनिवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजात सहभागी होता आले नव्हते. उदय सामंत रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आता अधिकृतपणे समोर आली आहे. कारण शिवसेनेचे मुख्य नेता तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांची रुग्णालयात जावून भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा देखील फोटो समोर आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबतही सविस्तर चर्चा केली. शिंदे यांनी उदय सामंत यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच सामंत यांच्या योग्य उपचार करुन लवकरात लवकर बरे करावे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी डॉक्टारांना दिल्याची माहिती आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्या कुटुंबियांशी देखील चर्चा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उदय सामंत यांच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना लवकर बरे व्हा, असं म्हणत शुभेच्छा दिल्या. “उदय सामंत हे अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष मंत्री आहेत. त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. ही दिलासादायक बाब आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी लवकर बरे व्हावे यासाठी राज्यभरासह रत्नागिरीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना उद्या रुग्णालयात डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते लवकरच जनतेच्या सेवेसाठी रुजू होतील, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. कोकणशाही मुंबई