‘त्या’ पाच जणांनी दिलेल्या त्रासातून बांद्यात युवकाची आत्महत्या, व्हिडिओ झाला व्हायरल !

सावंतवाडी : बांदा-मुस्लिमवाडी येथील आफ्ताफ कमरुद्दिन शेख वय वर्ष ३८ यांनी आज पहाटे घरात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शेख यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडिओ नातेवाइकांच्या हाती लागला. त्यात काही जणांची नावे घेत ते आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा उल्लेख असल्याने नातेवाईक संप्तत झाले. त्या सर्वांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका भाऊ अब्दुल रझाक शेख यांनी घेतली. त्यामुळे वातावरण चिघळले. रात्री उशिरापर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल न झाल्याने उपजिल्हा रुग्णालयामध्ये मुस्लिम समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

बांदा शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आफ्ताफ शेख याचा फूल विक्रीचा व्यवसाय होता. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीला काही संशयास्पद वाटल्याने तिने खिडकीतून पाहिले. पतीचे कृत्य पाहून त्यांनी आरडाओरड करत घराच्या वरच्या मजल्यावर राहणारा दिर अब्दुल रझाक याला बोलाविले. त्याने खाली येत दरवाजा तोडला व आतमध्ये जात शेख यांना गळफासावरून खाली काढले. त्यांना तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तेथे उपचारानंतर त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथून गोवा बांबुळी येथे हलवित असताना त्यांचे निधन झाले.

याच दरम्यान त्याने आत्महत्येच्या आधी केलेला व्हिडिओ नातेवाइकांच्या हाती लागला. त्यात त्याने पाच जणांची नावे घेत आपल्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. यानंतर त्याठिकाणी असलेल्या आफ्ताफ यांचा भाऊ अब्दुल रझाक याच्यासह नातेवाइकांनी आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पाचही जणांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. ही बातमी सावंतवाडी तसेच बांदा येथील मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचताच उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने त्यांनी गर्दी केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्यासह बांद्याचे निरीक्षक गजेंद्र पालवे, तसेच सावंतवाडीचे निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह पथकाने रुग्णालयात धाव घेत नातेवाइकांचे म्हणणे जाणून घेतले.

यावेळी अब्दुल रझाक याने पोलिसांना सांगितले, की माझ्या भावाला एप्रिलपासून किरकोळ गैरसमजातून फूल व्यवसाय करण्यासाठी काही जणांकडून त्रास दिला जात आहे. आमची तिसरी पिढी आज बांद्यामध्ये फूल विक्रीचा व्यवसाय करत आहेत; परंतु, काही जणांनी केलेल्या त्रासामुळे भावाचा व्यवसाय बंद राहिला आहे. तू दुकान सुरू केल्यास तुझ्यावर गुन्हा दाखल करू,” अशा प्रकारची धमकीही त्याला देण्यात येत होती. या संदर्भात त्याने बांदा पोलिस ठाणे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडेही संबंधित व्यक्तीविरोधात लेखी तक्रारही केली होती.

यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून तोडगा काढण्याचा प्रयत्नही झाला होता; परंतु, त्यात यश आले नव्हते. व्यवसाय बंद असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली होती. तो मानसिकरीत्या पूर्णपणे खचला होता. त्या पाच जणांनी दिलेल्या त्रासातूनच त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्या सर्वांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांच्यासोबत उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मुस्लिम बांधवाकडूनही हीच मागणी करण्यात आली. यावेळी तौकीर शेख, अॅड. शमीउल्ला ख्वाँजा, बांदा उपसरपंच जावेद खतिब, रफिक मेमन, आसिफ शेख, अॅड. संदीप निंबाळकर, वंचित बहुजनचे महेश परुळेकर, मौसिम मुल्ला आदी उपस्थित होते. निंबाळकर यांनी आरोप केला, की राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली पोलिस यंत्रणा राबत असून गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
दरम्यान, सायंकाळी सात वाजता पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी शेख यांच्या नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात बांदा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. चव्हाण यांनी नातेवाइकांना सांगितले, की घटनेचा रीतसर पंचनामा झाला नसताना कोणावरही गुन्हा दाखल करणे सयुक्तिक ठरणार नाही, रीतसर पंचनामा केल्यानंतर चौकशीमध्ये निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करू. त्यामुळे आपण मृतदेह ताब्यात घ्यावा.

पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याने मुस्लिम समाज बांधव आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने अखेर रात्री आठच्या सुमारास पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्या उपस्थितीत नातेवाइकांचा जाब जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
आईने फोडला हंबरडा
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे शेख यांची आई फैमिदा आल्या. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. आठ महिने आमचे दुकान बंद करून ठेवले आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल गेले. जत्रेत दुकान लावू देणार नसल्याचीही धमकी दिली. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, अशी विनंती करत हंबरडा फोडला. कोकणशाही बांदा