एसटीच्या धडकेत युवतीचा भीषण अपघात

सिंधुदुर्ग : तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीच्या सणाच्या दिवशी एक दुर्घटना घडली. फोंडाघाट गांगोवाडी येथील निकिता दिलीप सावंत या युवतीचा भीषण अपघातात मृत्यू झाला असून, तिच्या जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
लग्न ठरलेलं, घरात सुरू होती तयारी निकिता हिचं लग्न येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार होतं. काही काळापुर्वी तिचं लग्न ठरलं होतं आणि घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती. याच लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी ती काही दिवसांपूर्वी आपल्या गावी आली होती. रविवारी सकाळी निकिता आपल्या मामेभावासोबत दुचाकीवरून लग्नाच्या पत्रिका देऊन परत येत होती. कसवन तळवडे येथे पोहोचताच आंबरडच्या दिशेने येणारी एक एसटी बस अचानक त्यांच्या समोर आली. वैभव दिलीप सावंत या तिच्या भावाच्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर गाडीवरील ताबा सुटला आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

अपघातानंतर तिला तात्काळ त्या एसटी बसमधूनच आम्रड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात येत होतं. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच निकिताने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूची बातमी समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेने सावंत कुटुंबावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला आहे. घरात दिवाळी आणि लग्नामुळे आनंदाचे वातावरण होते, परंतू आता सगळीकडे शोककळा पसरली आहे. दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी घडलेली ही दुर्घटना केवळ सावंत कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण फोंडाघाट परिसरासाठी शोकांतिकेची ठरली आहे.
या अपघाताची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. एसटी बस चालकाविरोधात निष्काळजी वाहनचालकतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. कोकणशाही सिंधुदुर्ग