ऐन दिवाळीत सातोसे, मडुरा गावातील वीज पुरवठा गायब

बांदा : वीज महावितरणच्या हलगर्जी कारभाराचा फटका सातोसे, मडुरा गावातील वीज ग्राहकांना बसला असून ग्रामस्थांवर काळोखात दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून दोन दिवस वीज गायब असल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. याबाबत सोशल मीडियातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. महावितरणचे अधिकारी मात्र ‘नॉट रिचेबल’ आहेत.
महावितरणचा गोंधळी कारभार कायमच वीज ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. सातोसे, मडुरा गावात रविवारी सायंकाळपासून दोन दिवस वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे दिवाळी सण काळोखात साजरा करण्याची नामुष्की येथील ग्रामस्थांवर ओढवली आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण मानला जातो. या सणानिमित्त घराघरात आकर्षक विद्युत रोषणाई, आकाश कंदील लावले जातात. मात्र, सातोसे व मडुरा गावात वीजपुरवठा गायब झाल्याने दिवाळी काळोखात साजरी करावी लागत आहे.
सावंतवाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र राक्षे व बांदा सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकुर नॉट रिचेबल’ आहेत. वीज समस्या उद्भवल्यास ग्राहकांना अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध व्हावा, यासाठी महावितरणकडून प्रसिद्धी केली जाते. मात्र, अधिकाऱ्यांची मानसिकताच काम करण्याची नसेल तर काय करायचे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. कोकणशाही बांदा