
कोकणशाही प्रतिनिधी : प्रशांत रेवणकर
इनामदार श्री रामेश्वर संस्थान कसबा आचरे, तालुका मालवण गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने श्री देव रामेश्वर मंदिरात देवूळवाडा मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा स्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामवंत फुगडी संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट गायन, सांघिक मेहनतीमुळे बहारदार सादरीकरण आणि सुंदर साथ देणाऱ्या ढोलकीच्या मदतीने वेंगुर्ले तालुक्यातील केळूसच्या श्री. तारादेवी फुगडी संघाने बाजी मारत रोख रुपये १०,०००/- आणि आकर्षक चषकावर आपले नाव कोरुन प्रथम क्रमांक पटकावला. अलिकडेच नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावी झालेल्या फुगडी स्पर्धेत सुद्धा श्री. तारादेवी फुगडी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता तर दोडामार्ग तालुक्यातील कुब्रंल गावी झालेल्या फुगडी स्पर्धेत
श्री. तारादेवी फुगडी संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. नोव्हेंबर २०१५ ला स्थापन झालेल्या या ग्रुपला सुरुवातीच्या काळात अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागले होते, पण ग्रामदेवता तारादेवीच्या नावाने ओळखला जाणारा हा फुगडी संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावामध्ये गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, जत्रोत्सव तसेच विविध धार्मिक सणांच्या निमित्ताने निमंत्रित फुगडी, जुगलबंदी, फुगडी स्पर्धा यांच्या माध्यमातून आपली कला सादर करीत आहे. पारंपरिक फुगडीला आधुनिकतेची जोड देत आपल्या दर्जेदार सादरीकरणाने अव्वल स्थानावर राहणाऱ्या या श्री. तारादेवी फुगडी ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकणशाही – वेंगुर्ला केळूस









