सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आता आठवड्यातून पाच वेळा – फ्लाय९१ने वाढवली उड्डाणांची संख्या

कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास अधिक सुलभ; फ्लाय९१ने वाढवली सिंधुदुर्ग-पुणे उड्डाणांची संख्या

                   

पणजी, एप्रिल २०२५: प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, गोवा स्थित फ्लाय९१ विमानसेवेनं सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील सेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही सेवा आठवड्यातून दोनदाच उपलब्ध होती. वाढलेली वारंवारता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमधील प्रवास अधिक सुलभ करणार असून, या भागातील पर्यटन, व्यवसाय आणि सामाजिक संपर्क
वाढण्यास मोठी चालना मिळणार आहे.
सध्या फ्लाय९१ ही विमानसेवा कमी सुविधा असलेल्या भागांना इतर शहरांशी सहजपणे जोडण्यावर भर देत असून, या माध्यमातून प्रादेशिक विकासाला चालना देण्याचे कार्य करत आहे.

विमानसेवेची वारंवारता वाढल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसायांना नव्या संधी मिळण्याची आणि आर्थिक व्यवहार अधिक गतिमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन किल्ले आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यामुळे सिंधुदुर्ग हे पर्यटकांसाठी एक मंत्रमुग्ध करणारे ठिकाण ठरले आहे. निसर्गरम्य सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे येथील पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळत आहे. दुसरीकडे, पुणे हे आधुनिक तंत्रज्ञान, आयटी उद्योग, कृषी व्यापार आणि सांस्कृतिक विविधतेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहराचा झपाट्याने वाढणारा सेवा क्षेत्र आणि शिक्षणाचे व्यापक संधीमुळे ते व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वपूर्ण गंतव्यस्थान ठरत आहे.

“प्रादेशिक कनेक्टिविटी मजबूत करणे हे फ्लाय९१चे ध्येय आहे, आमच्या सिंधुदुर्ग-पुणे सेवेची वारंवारता वाढवणे हे प्रवास सुलभ बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. आम्हाला आशा आहे की या वाढीव वेळापत्रकामुळे अधिक प्रवाशांना सिंधुदुर्ग फिरण्याचा प्रोत्साहित मिळेल आणि स्थानिक व्यवसायांना देखील मदत होईल, तसेच सिंधुदुर्गातील रहिवाशांना महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या शहरात प्रवेश करणे सोपे होईल. मागणी आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार, या मार्गावर दररोज उड्डाणे करणे हे आमचे दीर्घकालीन ध्येय आहे,” असे फ्लाय९१ सीइओ मनोज चाको म्हणाले.

“सिंधुदुर्ग–पुणे–सिंधुदुर्ग मार्गावरील फ्लाय९१च्या उड्डाणांची वारंवारता वाढल्यामुळे स्थानिक रहिवाशांसाठी पुणे या व्यापार, सेवा आणि सांस्कृतिक केंद्राशी सहज जोडणं शक्य होणार आहे. त्याचबरोबर, पुणे आणि परिसरातील पर्यटकांना सिंधुदुर्गसारख्या उदयोन्मुख किनारी पर्यटन स्थळांकडे आकर्षित करण्यासही ही सेवा मदत ठरेल,” असे सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्य सल्लागार व प्रमुख, तसेच आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे प्रतिनिधी कॅप्टन जयसिंग सदाना यांनी सांगितले.

दक्षिण महाराष्ट्रातील विमानतळ आधुनिक आणि सुसज्ज आहे. ते एअरबस ए३२० आणि बोईंग ७३७ सारख्या मोठ्या विमानांना हाताळू शकते आणि दरवर्षी २० लाख प्रवाशांना सेवा देऊ शकते. हे विमानतळ कोकण आणि महाराष्ट्रातील जवळपासच्या भागांशी प्रवासी संबंध सुधारण्यास मदत करते.

फ्लाय९१ भारतातील टियर २ आणि टियर ३ शहरांमधील हवाई संपर्क वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. मोठ्या शहरांपासून दूर असलेल्या भागांनाही विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हेच कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या फ्लाय९१ गोवा, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि लक्षद्वीपमधील अगत्ती या सात ठिकाणी आपली सेवा देत आहे.फ्लाय९१ पुढील पाच वर्षांत ५० हून अधिक शहरे जोडण्याच्या प्रयत्न्यात आहे

                                                             ###