साईनाथ गांवकर / (मुख्य संपादक- कोकणशाही)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परगावात अन शेजारच्या गोवा राज्यात जाणाऱ्या वाळू वाहतुकीच्या डंपरची संख्या वाढली आहे. या डंपर मध्ये भरली जाणारी किती वाळू अधिकृत आहे अन किती वाळू अनधिकृत उपसा केलेली आहे ते फक्त त्या वाळू – डंपर व्यावसायिक अन प्रशासनातील काही बांबूनाच ठाऊक! पण हे डंपर रस्त्याने जातं असताना या गाड्यांमधून बाहेर निघणारा काळा धूर आणि त्यामुळे होणारे हवा प्रदूषण आर टी ओ अधिकाऱ्यांना दिसत नाही का? पी यु सीचा कागद सोबत असला की झालं. बाकी प्रत्यक्षात येणाऱ्या धुरामुळे दुचाकी चालक व पादचाऱ्याना या डंपर मधून येणारा काळा धूर रोज पोटातच घ्यावा लागतो. हे सगळं पाहून प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जातोय का? असा सवाल आता उपस्थित केला जातं आहे. हवा प्रदूषण करणाऱ्या किती डंपरवर कारवाई झाली आहे याची आकडेवारी प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे ओव्हर स्पीड ने डंपर येत जातं असतात. त्यामुळे डंपर खाली चिरडून किती अपघात होतायत. याची आकडेवारी सुद्धा आता समोर येणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या म्हणण्या नुसार वाळू वाहतुकीसाठी दिल्या जाणाऱ्या एका पास वर अनेक फेऱ्या मारल्या जातात. या अनेक फेऱ्या होण्यासाठीच अति वेगाचा वापर केला जातो. या अति वेगाने पळणाऱ्या डंपरवर ओव्हर स्पीडच्या किती केसेस दाखल केल्या गेल्यात? असे एक ना अनेक प्रश्न मात्र उपस्थित होत आहेत. वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे काही डंपर हे चालता फिरता यमराज झालाय, अशीचं भावना आज समाजात तयार होत आहे.









