हिंदू नववर्षाचे शोभायात्रा काढून स्वागत आ.किरण सामंत यांच्यासह नागरिकांचा सहभाग….

राजापूर

चैत्र शु. प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे राजापूरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शोभायात्रा काढून स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत आमदार किरण सामंत यांसह बहुसंख्य नागरिक पारंपारिक वेषात सहभागी झाले होते.ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथुन या यात्रेचा शुभारंभ झाला. सौ. व श्री. नम्रता मंदार बावधनकर यांचे हस्ते धर्मध्वजाचे पूजन तर शुभम कुशे यांच्या हस्ते धर्मध्वजाला पुष्पहार घालण्यात आला. दत्तात्रय रानडे यानी पौराहित्य केले तर अथर्व देसाई यांने ध्वजाचे सारथ्य केले.त्यानंतर आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थीतीत स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रेचा प्रारंभ झाला. याप्रसंगी विनोद गादीकर, अड. शशिकांत सुतार, महेश मयेकर, अभिजीत गुरव, सौरभ खडपे, शिल्पा मराठे, सुयोगा जठार, श्रुती ताम्हनकर, जयंत अभ्यंकर, संदेश टिळेकर, मोहन घुमे, विवेक गुरव, शीतशिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले अपक्ष महेश मयेकर यांच्या हस्ते शिवपुतळयाला पुष्पहारअर्पण करण्यात आला.या शोभायात्रेत नागरिकांनी पारंपारिक वेषभुषा सादर करत शोभायात्रेची शोभा वाढविली. कु. जिज्ञा हर्डीकर, कु. देवयानी, परी, गौरी शिवगण या बालकलाकारांनी विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांची केलेली आकर्षक वेषभुषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी जय श्रीराम, छत्रपति शिवाजी महाराज की जय,जय भवानी अशा घोषाणांनी शहर दणाणून गेले होते. शोभायात्रेत सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, हिंदवी स्वराज प्रतिष्ठान, शिवस्मृती मंडळ यांसह विविध हिंदु संप्रदाय व संघटना सहभागी झाल्या होत्या.श्री देव चव्हाटा मंदिर येथे महाआरतीने या यात्रेची सांगता झाली. या ठिकाणी अड. प्रशांत पाध्ये यांनी सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तर सर्व हिंदुनी संघटीत राहण्याचे आवाहन केले.