ब्युरो न्यूज कोकणशाही
भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशी (एचएएल) ६२ हजार ७०० कोटी रुपयांचे २ करार केले आहे. त्यानुसार एचएएल भारतीय सैन्याला १५६ अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स पुरवणार आहे.यापैकी पहिला करार भारतीय हवाई दलाला ६६ हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे आणि दुसरा करार भारतीय लष्कराला ९० हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे. या हेलिकॉप्टरचा पुरवठा कराराच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू होईल आणि पुढील ५ वर्षांत पूर्ण होईल. एलसीएच हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर ५ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर कार्य करण्यास सक्षम आहे.या हेलिकॉप्टरचे बहुतेक घटक भारतात डिझाइन आणि उत्पादित केले गेले आहेत आणि या खरेदी प्रक्रियेद्वारे हेलिकॉप्टर एकूण ६५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक प्राप्त करण्याचे नियोजन आहे. यामध्ये २५० हून अधिक देशांतर्गत कंपन्या सहभागी होतील, ज्यापैकी बहुतेक एमएसएमई असतील आणि ८५०० हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करतील. दरम्यान, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या वैमानिकांना हवेतून हवेत इंधन भरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मंत्रालयाने फ्लाइट रिफ्युएलिंग एअर क्राफ्टच्या (एफआरए) वेट लीजसाठी मेट्रिया मॅनेजमेंटसोबत करार केला.










