आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, पालकमंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला…

हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. पण भगव्याचा द्वेष करणाऱ्या आणि हिरव्याचे लांगुल चालन करणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा टोला पालकमंत्री नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते.नितेश राणे म्हणाले, भाजपा पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग ठाकरेंना खुपतोय. तो काढावा, अशी ते मागणी करत आहेत. पण आमचा झेंडा कसा दिसावा, याची चिंता उद्धव ठाकरेंनी करू नये. आता भगवा आणि ठाकरे यांचा काहीही संबंध राहिलेला नाही. मुख्यमंत्री होवूनही ठाकरेंना संविधानिक प्रक्रियांची माहिती नाही. विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्यावरून ते टीका करत आहेत. वस्तुत: जो कायदा देशाला तोच राज्याला लागू होतो. संसदेमध्ये विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संसदेत विरोधी पक्ष नेता नव्हता. तशीच स्थिती राज्यात आहे. पण ठाकरेंना कायद्याचा कोणताही अभ्यास नाही. देशात, राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व हिंसाचारामधील आरोपी हे एकाच धर्माचे आहेत. त्यामुळेच आम्ही त्या विरोधात आवाज उठवत आहोत. आम्हाला हिंदूत्व शिकवणाऱ्यांनी कधी त्या धर्मातील उन्मादींना संविधान शिकवले आहे का? त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केलंय का? हे आधी तपासून पहावे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.