घरफोडी ; साडेचार लाखांचे दागिने लंपास चोरटा सीसीटीव्हीत कैद….

सावंतवाडी :

आरोंदा – सावरजुवा येथील गीता हनुमंत गावडे यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घुसून तब्बल साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वा. घडली. संशयित चोराने सफेद रंगाचे टी-शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्या पुराव्याच्या आधारे त्याचा पोलिस शोध घेत आहे. आरोंदा-
सावरजुवा येथे राहणाऱ्या गीता गावडे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याची संधी साधून घराच्या वरच्या बाजूला असलेल्या खोलीत चोरवाटेने प्रवेश करून बेडखाली ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या खोक्यातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले दागिने त्याने चोरून नेले. यात दोन बांगड्या, एक मंगळसूत्र, एक ब्रेसलेट, दोन झुमके, दोन कानातली कुडी असा ४ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी यंत्रणा सतर्क केली आहे