रत्नागिरी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महामार्गावर येणाऱ्या पाच जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांत अपघात आणि अपघातातील बळींची संख्या वाढत आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेर १२७ अपघातांमध्ये १३७ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये ११५ पुरुषांसह २२ महिलांचा समावेश आहे. त्यातील सर्वाधिक अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत, ही बाब चिंता वाढविणारी ठरत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते वळणावळणाचे आहेत. अवघड वळणांवर होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे २० वर्षांपूर्वी मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे वाढते अपघाताचे प्रमाण चिंताजनक बनले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या १४ महिन्यांच्या कालावधीत १२७ गंभीर अपघात जिल्ह्यात झाले असून, त्यातील सर्वाधिक अपघात मुंबई- गोवा महामार्गावर झाले आहेत. या सर्व अपघातांमध्ये १३७ जणांचा नाहक बळी गेला आहे.याच कालावधीत ११९ छोटे अपघात झाले असून, त्यामध्ये २९२ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये २१० पुरुषांसह ८२ महिलांचा समावेश आहे. किरकोळ ८९ अपघातांमध्ये २६४ जणांना दुखापत झाली आहे. त्यामध्ये १८७ पुरूष तर ७७ महिलांचा समावेश आहे. ६४ अपघातांमध्ये केवळ वाहनांचे नुकसान झाले असून, चालक जखमी भागात झालेले नाहीत. चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर ते हातखंबा पर्यंत अर्धवट अवस्थेत आहे. या अपघातांची संख्या मोठी आहे. अर्धवट कामे पूर्ण होणार तरी कधी ?महामार्गावरील मुंबई-गोवा बहुतांश कामे अर्धवट स्थितीत आहेत. ती पूर्ण कधी होणार याची प्रतीक्षा आहे. अर्धवट कामांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याबाबत टीका झाल्यानंतर कामे पूर्ण करण्यासाठी अंतिम तारखा आजवर अनेकवेळा दिल्या गेल्या पण प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्याने अपघात आणि अपघातील मृत्यू आणि जखमींची संख्या वाढत आहे. अपघातानंतर वाहनांच्या महामार्गावर लागणाऱ्या लांबच लांब रांगाही चिंता वाढविणाऱ्या ठरत आहेत.महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश मुंबई – गोवा महामार्ग महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांतून जातो. त्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे ४६६ किलोमीटरचा हा महामार्ग आहे.डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करणार महामार्ग चौपदरीकरणा नंतर अपघातांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. यासाठी महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरू होण्याची आवश्यकता आहे. २०२५ डिसेंबर अखेर महामार्ग पूर्ण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु यामध्ये सरकारला किती यश येते हे येत्या दहा महिन्यात स्पष्ट होणार आहे.










