सावंतवाडी
माडखोल गावात शासनाने चार वर्षांपूर्वी जलजिवन मिशन योजना मंजूर करूनही अद्याप या योजनेचे काम सुरू करण्यात आलेले नाही. पर्यायाने या योजनेचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसात या योजनेचे काम सुरू न केल्यास ग्रामपंचायतीसमोर शुक्रवारी २१ मार्च रोजी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा माडखोल गाव विकास संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, माडखोल गावात धरण असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या उदासीन, अकार्यक्षम, नियोजनशून्य कारभारामुळे गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. या पार्श्वभूमीवर माडखोल गावासाठी २०२० २०२१ मध्ये जलजीवन मिशन योजना शासनाने मंजूर केली. मात्र पंचायतीच्या उदासिन कार्यपद्धतीमुळे गेल्या चार वर्षात या जलजिवन मिशन योजनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. हे दुर्दैवी व खेदनीय आहे. योजना गेल्या पाच वर्षात सुरू न झाल्याने योजनेचा मंजूर निधी परत जाण्याची शक्यता आहे.
माडखोल गावाला पाणीपुरवठा करण्याबाबत सुरवातीपासूनच केलेले चुकीचे नियोजन, शासकीय निधी उचलण्याकरिता चुकीच्या व संमिश्र पद्धतीने राबविलेल्या योजना, पाणीपुरठ्याबाबत ग्रामसभा अगर मासिकसभांना
विश्वासात न घेण्याची वृत्ती, वरिष्ठ जाणकारांचे मार्गदर्शन न घेता योजना राबविणे, आदी कारणांमुळे माडखोल गावातील पाण्याचा प्रश्न जटील होत गेला. माडखोल गावासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत दोन कोटी रूपये मंजूर आहेत.
आता उन्हाळा तीव्र झाला असून गावातील टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. तरी पुढील चार दिवसात जलजीवन मिशन योजना राबविण्याबाबत आवश्यक पूर्तता करावी व योजनेचे काम तात्काळ चालू करावे, तसेच माडखोल-बामणादेवी येथील लघु नळपाणी योजनेचे कामदेखील गेली तीन वर्षे ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अर्धवट स्थितीत आहे. माडखोल धवडकी परिसरातील लघु नळपाणी योजना तयार करणे हे काम देखील तात्काळ चालू करणे आवश्यक आहे. आपण जलजीवन मिशन योजने अंतर्गत माडखोल गावातील प्रलंबित सर्व कामांची आवश्यक पूर्तता करून कामे तात्काळ चालू न केल्यास उद्भवणाऱ्या समस्यांना तसेच जलजीवन मिशन योजनेचा निधी परत गेल्यास होणाऱ्या परिणामाना ग्रामपंचायत जबाबदार असेल, असा इशारा या पत्रकातरून देण्यात आला आहे.
दत्ताराम राऊळ, आनंद राऊळ, संजय राऊळ, राजकुमार राऊळ, विजय राऊळ आदींसह ग्रामस्थांनी हे निवेदन दिले आहे.










