नवीन वर्षाचे स्वागत करतानाच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटक मुरुड आणि काशीद समुद्रकिनारी आले होते. त्यातील एका पर्यटकाचा काशीद समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला आहे. काशीद समुद्रकिनाऱ्यावरील आठवड्यातील ही दुसरी दुर्घटना असल्यामुळे बीचवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि पर्यटकांनी घ्यायच्या काळजीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगळवारी (31 डिसेंबर) साडेतीन वाजता पुण्यातून आलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाला. यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील वातावरण काही काळ शोकाकूल झाले होते.
पुण्यातील जैनवाडी जनता वसाहतील प्रतीक सहस्रबुद्धे (31) त्याच्या मित्रांसोबत थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुरुड-काशीदमध्ये आला होता. दुपारी साडेतीन वाजता ते सर्व समुद्रात पोहत होते. त्यात प्रतीकला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.दीड तासानंतर प्रतीकचा मृतदेह पाण्यात तरंगताना लाईफ गार्डने पाहिला. त्यांनी पोलिसांच्या मदतीने प्रतीकचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी ताबडतोब त्याला मुरुड ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रतीककडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने तिन्ही मित्र शोकाकूल झाले तर प्रतीकच्या घरी ही घटना कळवल्यावर त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला. मुरुडचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख आणि हवालदार हरि मेंगाळ यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा तपास हवालदार हरी मेंगाळ करत आहेत.










