सोलापूर येथे मुलीच्या जन्मानंतर झालेली दोन्ही मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने त्या दोन्ही मुलांना गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत टाकले. नंतर स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली. वांगी (ता. उत्तर सोलापूर) येथे ही दुर्घटना घडली. चित्रा कविराज हाके, स्वराज हाके यांचे मृतदेह सापडले असून पृथ्वीराज गाळात अडकल्याने शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मूळचे नान्नज येथील असलेले कविराज ऊर्फ दत्तात्रेय हाके काही वर्षांपूर्वीच कुटुंबासह सासरवाडीला वांगी येथे राहायला गेले होते. त्यांना एक आठ वर्षांची मुलगी असून तिच्यानंतर चित्रा यांना पृथ्वीराज व स्वराज अशी दोन मुले झाली. पृथ्वीराज गतिमंद, पण दीड वर्षाचा स्वराज देखील गतिमंदच जन्मला. त्यातून चित्रा यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत होती. या चिंतेतून त्यांनी मुलांसोबत जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला.गावाजवळील विहिरीत त्यांनी मुलांना टाकून स्वतःही उडी घेतली, त्यावेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळ्या चारणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीकडे धाव घेतली, मात्र विहिरीलगत दाट झाडी असल्याने विहिरीपर्यंत जायला त्यांना वेळ लागला. विहिरीत डोकावून पाहिल्यावर दीड वर्षाचा स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली.










