कुडाळ
कुडाळ बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या दोन महिलांचे पाकीट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यामध्ये सुमारे १० हजार ५०० रुपये एवढी रक्कम होती. बुधवार आठवडी बाजार असल्याने कुडाळ येथील सोनाली भास्कर सावंत ही महिला बहिणीसोबत खरेदीसाठी आली होती. त्यांनी एका दुकानात किराणा सामान घेऊन ठेवले व पैसे नसल्याने एटीएम मधून १० हजार रुपये काढले. त्यानंतर मच्छीमार्केट येथून मासे घेतले व परत चालत येत असताना रस्त्यावर बरीच गर्दी होती. त्यावेळी तेथे एका महिलेने सावंत यांना ढकलले. त्या महिलेने अंगावर बुरखा घातला होता. पुढे
चालत आल्यावर कलिंगड वाल्याकडे एक कलिंगड घेतले व त्याचे पैसे देण्यासाठी पिशवीत ठेवलेले पाकीट पाहीले असता पिशवीत पाकीट दिसले नाही.
या पाकिटाचा शोध घेऊनही ते सापडले नाही. तसेच शैला शरद आळवे (वय ४५, रा. लक्ष्मीवाडी कुडाळ) हीचेसुद्धा कुडाळ मच्छीमार्केट येथे हातात असलेल्या पिशवीतील पाकीटातील एक हजार रुपये चोरीस गेले आहेत. या चोरी प्रकरणी एक बुरखाधारी व अंदाजे ३५ वर्षे वय असलेल्या महिलेवर सावंत संशय व्यक्त केला आहे. या चोरी प्रकरणी अज्ञातावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










