तरुण पोलिसाचा तिरवडे येथे अपघातात मृत्यू

वैभववाडी :

खारेपाटण – गगनबावडा मार्गावर तिरवडे येथे एक्टिवा मोटारसायकल व भाजीचा टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार कृष्णा मनोहर ठोंबरे (वय 25, मूळ गाव बोडका, जि. छत्रपती संभाजीनगर) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेल्या रत्नागिरी महिला पोलिस आरती अमर चौगुले (21, मूळ रा. बिद्री कागल, जि. कोल्हापूर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात रविवारी सकाळी 7.30 वा. च्या सुमारास घडला. सकाळी पडलेल्या दाट धुक्यांमुळे हा अपघात घडल्याचा
अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णा ठोंबरे हे रत्नागिरी पोलिस ठाण्यात पोलिस म्हणून सेवेत होते.गगनबावड्याहून भाजीचा टेम्पो घेऊन टेम्पोचालक कादर ओमर पाटणकर (48, रा. कातळी, ता. गगनबावडा) हा उंबर्डेला येत होता. तर मोटारसायकलस्वार ठोंबरे हे एक्टिवा मोटारसायकल घेऊन त्यांची मानलेली बहीण आरती चौगुले यांच्या घरी बिद्री-कागल, जि. कोल्हापूर येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी पहाटे रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जात होते.
दरम्यान, रविवारी सकाळी सर्वत्र दाट धुके पडले होते. धुक्यात अंदाज न आल्यामुळे तिरवडे येथील सर्व्हिस सेंटरजवळ असलेल्या वळणावर टेम्पो वॲक्टिव्हा यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात ठोंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ठोंबरे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर गंभीर जखमी आरती चौगुले यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताचे वृत्त समजताच वैभववाडी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधुरी अडुळकर, हवालदार आ. बी. पाटील, राहुल तळसकर, अजय बिलपे, राजू येळगे, भगीरथ मोवळे, पुंडलिकवानोळे, हरिभाऊ जायभाय आदी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. रत्नागिरीचे राखीव पोलिस निरीक्षक राजेंद्र कुळशिंगे यांनीही वैभववाडी पोलिस ठाणे येथे भेट देऊन माहिती घेतली.
2023 मध्ये रत्नागिरी पोलिस म्हणून सेवेत,
कृष्णा ठोंबरे हे 2023 साली रत्नागिरी पोलिस म्हणून सेवेत दाखल झाले होते. सध्या ते रत्नागिरी पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. याची माहिती समजताच राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच मयत ठोंबरे यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना इथे न बोलवता रत्नागिरी पोलिस व सिंधुदुर्ग पोलिस यांच्यामार्फत मृतदेह त्यांच्या मूळ गावी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यासाठी अॅम्बुलन्स उपलब्ध करून दिली. मयत ठोंबरे यांच्या पश्चात आई- वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.