बंद घरे फोडून ; दागिन्यांसह रोकड लंपास..


कणकवली :

कणकवली शहरातील नाथ पै नगरातील बंद घरे शुक्रवारी रात्री चोरट्यांकडून लक्ष करण्यात आली. एका घरातील ज्येष्ठ नागरीक दांपत्य मुंबईला गेले असल्याने ते घर फोडून कपाटातील साडेचार तोळ्याचे दागिने व काही रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास करण्यात आली. मात्र हे दांपत्य मुंबईवरून आलेले नसल्याने पोलिसात तक्रार दिलेली नाही. तर याच नगरातील निवासी संकुलातील दोन बंद फ्लॅट चोरट्यांकडून फोडण्यात आले. याचीही तक्रार दाखल नसल्याचे समजते. मात्र परिसरात याची चर्चा असून चोरटे मोकाट आहेत.
कुडाळ बरोबरच आता कणकवली शहरातही चोरट्यांकडून बंद घरे फोडून डल्ला मारण्याचे काम केले जात आहे. नाथ पै नगरात राहणारे ज्येष्ठ नागरिक दांपत्य काही दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी शुक्रवारी रात्री या घरात प्रवेश करत आतील दागिने व रोकड लंपास केली. मात्र हा प्रकार
रविवारी सकाळी लक्षात आला. त्याच घरातील भाडेकरू रविवारी सकाळी तेथे गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी घरमालकांशी संपर्क साधुन माहिती दिली. घरातील कपाट उघडलेल्या अवस्थेत होते. त्याची माहिती दिल्यानंतर आत ठेवलेले साडेचार तोळ्याचे दागिने व काही रोकड लंपास असल्याचे दिसून आले. मात्र घरमालक उपस्थित नसल्याने पोलिसात याची तक्रार दाखल झालेली नाही.
याच रात्री नाथ पै नगरात असलेले अन्य दोन फ्लॅट चोरट्यांकडून फोडण्यात आले. या इमारतीतील अन्य फ्लॅटच्या दरवाजांना बाहेरून कड्या घालण्यात आल्या. मध्यरात्रीनंतर ३ वा. च्या सुमारास हा प्रकार घडला. काही रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आजुबाजुच्या नागरिकांना फोन करून याची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी पळ काढला होता. शुक्रवारी रात्री झालेल्या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.