प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! तुमचं तिकीट वेटिंगवर असेल तर… मध्य रेल्वेचा…

प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी करण्याचा मोठा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर असणाऱ्या तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेने प्रवास करताना तुमचं रेल्वे तिकीट कन्फर्म असेल तरच तुम्हाला रेल्वेने प्रवास करता येणार आहे. तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, वेटिंग लिस्ट प्रवाशांना प्रवास करण्यास आता नो एन्ट्री असणार आहे. तर कन्फर्म तिकीट असणाऱ्या रेल्वे प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेटिंग तिकीट धारकांसाठी काही महत्त्वाचे नियम रेल्वेकडून लागू कऱण्यात आले होते. त्या नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे आरक्षित डब्ब्यात होणारी गर्दी कमी करणे आणि कन्फर्म  तिकीट असलेल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा हा होता. अनेक प्रवाशांनी वेटिंग तिकीटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे होणाऱ्या अडचणीची तक्रार केली होती. त्यामुळे वेटिंग तिकट धारकांना आरक्षित कोचमध्ये प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली होती.