नाशिक
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारा निर्णय समोर आला आहे. अजित पवार गटाती महत्त्वाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आ ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. १९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, समर्थकांमध्ये नाराजी आणि विरोधकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सदर प्रकरण १९९५ सालचे असून, त्यावेळी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४६५ (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि ४७४ (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्याचा निकाल तब्बल २९ वर्षांनी लागला असून, न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावास २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.









