भरघोस पीक आलेले असताना;भात खरेदीत निराशाजनक चित्र…

रायगड

रायगड जिल्ह्यात यंदा भाताचे भरघोस पीक आलेले असताना देखील हमीभावाने भात खरेदीत मात्र निराशाजनक चित्र असल्याचे पाहायला मिळाले. शासनाने चांगला दर देऊनही मागील वर्षीच्या तुलनेत हमीभाव भात खरेदी केंद्रांवर खूपच कमी भात विक्रीसाठी आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 28 केंद्रांवर 3 लाख 69 हजार क्विटल भाताची खरेदी झाली आहे. मागील वर्षी तब्बल 6 लाख 51 हजार क्विंटल भात खरेदी झाली होती. या वर्षी सर्वसाधारण भाताला 2 हजार 300 रुपये प्रति क्विटल दर शासनाने दिला आहे. तर अदर्जाच्या भाताला 2 हजार 320 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यात दरवर्षी भाताची चांगली विक्री होते, त्यामुळे 28 खरेदी केंद्रांवर भात खरेदीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
भाताची खरेदी ही ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारने यंदा भाताला सरसकट प्रति हेक्टरी 20 हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. शेतकऱ्याने भात हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी आणला नाही तरी हा बोनस दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अट ठेवण्यात आली आहे. जो शेतकरी ऑनलाइन नोंदणी करेल त्याला बोनसचा लाभ देण्यात येत आहे. पावसाने साथ दिल्याने जिल्ह्यात यंदा भाताची उत्पादकता वाढली आहे. यंदा प्रति हेक्टरी 29 क्विटल भाताचे उत्पादन झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. भातपीक कापणीला आले की कृषी विभागातर्फे भाताची उत्पादकता शोधण्यासाठी पीककापणी प्रयोग केले जातात. दरवर्षी प्रत्येक महसूल मंडळात 12 गावे निवडून तेथील ठरावीक भागात भाताची कापणी, मळणी करून भाताचे उत्पादन किती आहे. याचा अंदाज घेतला जातो. यंदा जिल्ह्यात भातकापणीचे 1 हजार प्रयोग घेण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात यंदा भाताची उत्पादकता प्रति हेक्टरी 29 ते 30 क्विटलपर्यंत दिसून आली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादकतेत किंचित वाढ झाली आहे.