ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मागील काही दिवस संझगिरी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या आवडीने त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांमध्ये काम केले. मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी करताना २००८ मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली. १९७० च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये १९८३ वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांनी इतर काही मित्रांसह एकच षटकार हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते. त्यात संझगिरी हे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते.










