ब्युरो न्युज कोकणशाही
केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. स्पर्धेअखेर पंचांनी दोन कुस्तीपटूंवर कारवाई केली. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या व्यतिरिक्त पंचांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने कुस्तीपटू महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.
उपांत्य फेरीतील गादी विभागाच्या सामन्यात शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली होती. पृथ्वीराज मोहोळने टाकलेल्या डावामुळे शिवराज राक्षे खाली पडला पण त्याची पाठ टेकली नसताना पंचाने पृथ्वीराज मोहोळला विजयी केले. पंचाच्या निर्णयावर शिवराज राक्षेसह त्याचे प्रशिक्षक, हितचिंतकांनी आक्षेप घेतला. शिवराज राक्षेने पंचाच्या निर्णयाविरोधात तांत्रिक समितीकडे दाद मागितली. नियमानुसार कुस्ती चितपट झाल्यास त्या निर्णयावर दाद मागता येत नाही. यामुळे या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. या निर्णयामुळे शिवराज राक्षे संतापला. त्याने पंचाची कॉलर धरली. पंचाला लाथ मारली. यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केल्याचे जाहीर करण्यात आले. या गोंधळात वेळ वाया गेला आणि अंतिम सामना सुमारे दीड तास उशिराने सुरू झाला.










