वेंगुर्ले प्रतिनिधी ३१
वेंगुर्ले शहरातील एका फायनान्स कंपनीने वेंगुर्ला येथील एका व्यक्तीला ११ लाखाचे कर्ज देऊन तब्बल ६९ लाखाची वसुली करण्यासंदर्भाची नोटीस दिली आहे. श्यामसुंदर मालवणकर असे त्याचे नाव आहे. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेण्यात आली असून झालेल्या प्रकाराच्या विरोधात संबंधित कंपनीच्या कार्यालयासमोर ११ फेब्रुवारीला आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांनी दिला आहे. आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.त्यांच्या म्हणण्यानुसार, मालवणकर यांनी २०१३ मध्ये संबंधित फायनान्स कंपनीकडून ११ लाखाचे कर्ज प्रक्रिया करून सेकंड हॅन्ड ट्रक खरेदी केला होता. तसेच कर्ज प्रक्रिया करून कंपनीने ट्रक ताब्यात दिला. मात्र मूळ मालकाची एनओसी दिली नाही. त्यामुळे एनओसी उपलब्ध करून द्या, अशी वारंवार मागणी त्यांनी संबंधित फायनान्स कंपनीकडे केली. परंतु कंपनीने एनओसी देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मालवणकर यांनी एक हप्ता वगळता पुढील हप्ते भरले नाही. दरम्यान एक वर्षानंतर संबंधित फायनान्स कंपनीने तो ट्रक जप्त केला. मात्र आता ६९ लाखाची वसुली करण्यासंदर्भाची नोटीस दिली आहे. ही फसवणूक असून या संदर्भात आपण न्यायालयात दाद मागणार असून संबंधित कंपनीच्या विरोधात ११ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येणार आहे, असे ही ते म्हणाले.










