कणकवली :
ग्रामीण भागाची विकास प्रक्रिया गतीमान होण्यासाठी ग्रामपंचायतींनी नवनवीन संकल्पना तयार कराव्यात. लोरे नं. 1 ग्रामपंचायतने जसा शासन आणि लोकसहभागातून उपक्रम यशस्वी केला, तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रयत्न करावा. नावीन्यपूर्ण संकल्पना ग्रामपंचायत स्तरावर राबवाव्यात. सिंधुदुर्ग हा विकासाचा मॉडेल बनला पाहिजे, त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू. आवश्यकतेप्रमाणे स्वतंत्र हेड खाली निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेशराणे यांनी दिली.मंत्री राणे म्हणाले, एक गाव म्हणून आपण काय काय करू शकतो हे सरपंच अजय रावराणे यांनी सातत्याने करून दाखवले आहे. त्यांना गावाची मिळालेली साथ आणि उपसरपंच गुरव, सर्व सदस्यांचा पाठींबा यामुळे आज एक उत्कृष्ट असे गार्डन या ठिकाणी तयार झाले आहे. गाव म्हणून आपण एकसंघ राहून विकासाला प्राधान्य दिले. शासनाचा, लोकप्रतिनिधींचा निधी हा मिळतोच, मात्र ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून निधी उभा करावा आणि विकास कामाला गती द्यावी, हे निश्चितच आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मंत्री नितेश राणे यांनी काढले. आया काळात लोरे गाव विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपास येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.










