सावंतवाडीः सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महावितरणच्या वीज पुरवठ्याचा मोठ्या प्रमाणावर खेळखंडोबा सुरू असून सातत्याने होणारा कमी दाबाचा पुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज आणि अचानक येणारा उच्च दाबाचा प्रवाह यामुळे जिल्ह्यातील नागरिक आणि व्यावसायिक होरपळून निघाले आहेत. या वीज संकटामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले असून व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, विद्यार्थी आणि गृहिणी कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. महावितरणचे अधिकारी मात्र प्रत्येक वेळी थातूरमातूर कारणे पुढे करून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप पर्यटन व्यावसायिक व वीज समस्येचे अभ्यासक नितीन वाळके यांनी मालवण येथील पत्रकार परिषदेत केला.
नितीन वाळके यांनी सांगितले की, जिल्ह्यात रोज सकाळी ७ ते ७.३० वाजल्यापासूनच अवघा १२० ते १३० व्होल्ट एवढाच कमी दाबाने वीजपुरवठा सुरू होतो आणि ही परिस्थिती दिवसभर कायम राहते. सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र, या वीज संकटामुळे होमस्टे आणि ‘निवास न्याहारी’ चालकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक पर्यटकांनी आपली आगाऊ आरक्षणे रद्द केली आहेत, तर आलेले पर्यटकही नाराज होऊन सुट्टी अर्धवट सोडून परत जात आहेत. ही संपूर्ण परिस्थिती केवळ महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि उत्तरदायित्वाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे.
एकीकडे ग्राहकांना किमान मूलभूत सुविधाही देता येत नसताना, दुसरीकडे महावितरणकडून अव्वाच्या सव्वा वीज बिले आणि नवीन ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ भरण्यासाठी ग्राहकांकडे सक्तीचा तगादा लावला जात आहे, हा जनतेवर सरळ-सरळ अन्याय असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या












