आ. प्रमोद जठारांच्या मागणीला बबन साळगावकरांचा ठाम पाठिंबा!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासकीय भरतीत ८० टक्के जागा स्थानिकांसाठीच राखीव ठेवाव्यात, या विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणण्याच्या जठार यांच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. जिल्ह्यात १० हजार शिक्षक भरती तसेच जिल्हा संवर्ग भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यासाठी हे विधेयक आणले जात असल्याने स्थानिक तरुणांमध्ये रोजगाराची नवी आशा निर्माण झाली आहे. कोकणातील रोजगारनिर्मितीसाठी हे पाऊल आधीच उचलणे गरजेचे होते, मात्र आता आमदार प्रमोद जठार यांनी योग्य पुढाकार घेतला असल्याचे साळगावकर यांनी म्हटले आहे.
स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि गोवा या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. या सततच्या स्थलांतरामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या वेगाने घटत असून ग्रामीण भागाचे चित्र बदलले आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये तरुणांची संख्या नगण्य झाली असून ही गावे आता केवळ वृद्धांची गावे म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत.
जिल्ह्यातील ही घटती लोकसंख्या रोखण्यासाठी आणि तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी त्यांना स्थानिक पातळीवरच काम मिळणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच शासकीय भरतीत ८० टक्के जागा स्थानिक युवक-युवतींसाठी राखीव ठेवण्याची भूमिका अत्यंत योग्य असून, यासाठी विधिमंडळात मांडल्या जाणाऱ्या विधेयकाला आपला पूर्ण पाठिंबा राहील, असे बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले.