‘तळेरे तालुका आमचा हक्क!’ निर्मितीसाठी कृती समितीचा महाएल्गार मेळावा

नव्याने तळेरे तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे यासाठी नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने महाएल्गार मेळाव्याचे २९ ऑगस्ट रोजी तळेरे येथे आयोजन

तळेरे दशक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली – तळेरे :

शासन व प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी नियोजित तळेरे तालुका कृती समितीने दशक्रोशीतील ग्रामस्थासह आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या नियोजित तळेरे तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे या आग्रही मागणीसाठी शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता तळेरे येथील स्मित लाॅन्स सभागृहात निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून तळेरे तालुक्याची निर्मिती करण्याचे स्वप्न समस्त तळेरेवासीय आणि दशक्रोशीतील ग्रामस्थांचे आहे. तशाप्रकारची मागणी सातत्याने करण्यात येत असून त्याबाबतचा शासनदरबारी सतत पाठपुरावा सुरू आहे. मात्र शासन या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत नसून त्यासाठी शासन व प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी नियोजित तळेरे तालुका कृती समितीने आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

  नियोजित तळेरे तालुका कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री यांना याबाबत वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. तसेच त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासनदरबारी पोहोचलेला आहे. यापूर्वी तळेरे सोबतच जिल्ह्यातील दोडामार्ग आणि वैभववाडी या दोन तालुक्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र त्यावेळी राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने तळेरे तालुका घोषित होऊ शकला नाही. 
    मुंबई गोवा आणि विजयदुर्ग -कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व सोयी सुविधांनी युक्त व मध्यवर्ती ठिकाण म्हणून तळेरे गावाची वेगळी ओळख आहे. ब्रिटिशकालीन व ऐतिहासिक बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आजुबाजुच्या दशक्रोशीतील कणकवली व देवगड तालुक्यातील विजयदुर्ग पट्टयातील किमान ४५ ते ५० गावातील जनतेला मध्यवर्ती बाजारपेठचे ठिकाण म्हणून तळेरे हे ठिकाण सर्वदृष्ट्या सोईस्कर ठरते.
  मात्र राज्यातील नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या अनेक तालुक्यांच्या नावांची घोषणा काही महिन्यांपूर्वी शासनाकडून करण्यात आलेली आहे. मात्र या यादीत देखील पुन्हा एकदा तळेरे तालुका निर्मिती होण्यासाठीचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता शासनव्यवस्थेला तळेरे दशक्रोशीतील गावांची एकजूट दाखवून देण्यासाठी आणि या मागणीसाठी जनतेचा उत्स्फूर्तपणे उठाव करुन तळेरे तालुका निर्मितीसाठीची मोहीम अधिक व्यापक व्हावी यासाठी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुढिल दिशा ठरवली जाणार आहे.
   तरी या महाएल्गार मेळाव्याला तळेरे गावातील सामाजिक संस्था, सर्व मंडळांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थी, व्यापारी संघटना, रिक्षा, टेंपो, मॅजिक संघटना, महिला बचतगट, युवक, युवती, ग्रामस्थ तसेच तळेरे दशक्रोशीतील सर्व आजी माजी जि.प., पं.स.सदस्य, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्त्ये आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तळेरे तालुका कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ राजू जठार, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर आणि माजी पं.स.सभापती तथा भाजपा कणकवली तालुका मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी आवाहन केले आहे.