पावसाने मारली दडी, सिंधुदुर्गातील बळीराजा चिंतेत

सिंधुदुर्ग : गोव्यातून मान्सून वेळेत सिंधुदुर्गात दाखल झाला असला तरी जून महिना संपत आला तरी पावसाने अपेक्षित वेग पकडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.
मान्सूनच्या आगमनानंतर बळीराजाची शेतीची लगबग सुरू झाली आणि अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने पेरलेले भात पीक धोक्यात आले आहे. उन्हाळ्यासारखे वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ सरासरी १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी याच कालावधीत सरासरी ४४० मिमी पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत सरासरीच्या केवळ २३ टक्केच पाऊस झाला आहे.
काही प्रमाणात पेरणी झालेली असली तरी पाण्याअभावी रोपे सुकण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे आता बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले असून, दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे