कुडाळ बसस्थानकात मंगळवारी दुपारी घडलेल्या एका धाडसी आणि सतर्कतेच्या घटनेमुळे संभाव्य सोनसाखळी चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. नेरूर येथील एसटी चालक प्रशांत महादेव गावडे यांनी प्रसंगावधान राखत एका युवतीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय संशयित इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास कुडाळ मालवण एसटी बस फलाटावर लागली असताना बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत एका संशयित इसमाने बसमध्ये चढणाऱ्या एका युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला.
ही बाब त्याचवेळी बाजूला उभी असलेल्या कुडाळ पणजी बसचे चालक प्रशांत गावडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बसमधून खाली उतरून त्या संशयित इसमाला हटकले. सुरुवातीला त्या इसमाने “मी काही केले नाही” अशी भूमिका घेतली. मात्र संबंधित युवतीनेही गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट सांगितले.
प्रशांत गावडे यांनी तत्काळ कुडाळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित इसमाला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली. संबंधित युवतीनेही पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.
दरम्यान, प्रशांत गावडे यांच्या धाडसाचे आणि सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते राजू राऊळ व उपसभापती तुकाराम तेली यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ता सेलचे जिल्हा संयोजक निलेश तेंडुलकर, सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघटनेचे कुडाळ आगार अध्यक्ष जयेश चिंचळकर, जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, तेंडोली पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, एसटी वाहक दिनेश शिरवळकर, नगरसेवक सचिन काळप, नगरसेवक निलेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, मुक्ती परब, श्रावण शिरसाठ व शशिकांत आरोलकर आदी उपस्थित होते.
बसस्थानक, बाजारपेठ, यात्रा-जत्रा अशा गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांची नजर असते. त्यामुळे प्रवासादरम्यान नागरिकांनी सतर्क राहणे, संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे आणि अशा प्रसंगी धाडसाने पुढे येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.












