“मुंबईकरांचा जलप्रवास स्मार्ट बनणार; पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा”

प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) प्रवासी जलवाहतूक अधिक आधुनिक आणि सुलभ पद्धतीने विकसित करण्याच्या उद्देशाने, ऑनलाइन तिकीट वितरण आणि विक्री प्रणाली सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत एक आढावा बैठक झाली.

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, जलवाहतुकीमध्ये डिजिटल प्रणालींचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये; तिकीट प्रक्रिया अधिक जलद व्हावी आणि संपूर्ण प्रणालीमध्ये पारदर्शकता प्रस्थापित व्हावी—यासाठी ऑनलाइन तिकीट प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरेल. मान्सूनपूर्व काळात जलवाहतूक सेवा अधिक वेगाने सुरू करणे. यावेळी गेटवे ऑफ इंडिया, बेलापूर, एलिफंटा आणि डीसीडी टर्मिनल यांसारख्या मार्गांवर सेवा लवकर सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

महाराष्ट्र सागरी मंडळ आणि खाजगी भागीदारांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतर्गत, मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक डिजिटल पास सुरू करण्याची योजना आहे. पुढील तीन महिन्यांत किमान ५० टक्के व्यवहार ऑनलाइन माध्यमांतून करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, आणि दररोज होणाऱ्या अंदाजे २२,००० तिकीट व्यवहारांपैकी किमान ११,००० व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

या बैठकीत स्मार्ट स्वयंचलित गेट्स, क्यूआर कोड-आधारित प्रवेश प्रणाली, हँडहेल्ड तिकीटिंग यंत्रणा आणि बहु-माध्यमी पेमेंट प्रणाली यांवर सादरीकरणे करण्यात आली.

या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अधिकारी, श्री पी. प्रदीप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.