रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंगळवारीभाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. पहाटे साडेतीनपासूनच भक्तांचा महासागर लोटला आहे. काल दिवसभरात सुमारे ७० हजार भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतल्याचा अंदाज असून, या माध्यमातून परिसरात सुमारे ८० लाखांची आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काल पहाटे साडेतीन वाजता श्रींची पूजाअर्चा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली. बाप्पांच्या गाभाऱ्यात केलेली आंब्याची आरास लक्षवेधी होती. सोमवारी सायंकाळपासूनच भाविकांनी हजेरी लावली होती. पश्चिम महाराष्ट्रातील तरुण वर्ग आज सकाळी गणपतीपुळेमध्ये दाखल झाला होता. सकाळच्या सत्रात तुरळक गर्दी होती. मात्र, दुपारनंतर दर्शनासाठी रांगाच्या रांगा पाहायला मिळाल्या.
पोलिस, जीवरक्षक आणि मंदिराचे सुरक्षारक्षक तैनात होते. सायंकाळी ४.३० वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांसह मुख्य पुजारी आणि देवस्थानचे ट्रस्टी सहभागी झाले होते. मंदिर दर्शनासाठी रात्री ११ वाजेपर्यंत खुले ठेवले होते.
यात्रोत्सवानिमित्त दिवसभरात दर्शनासाठी सुमारे ७० हजार भाविक आल्याची नोंद मंदिरात झाली. परजिल्ह्यातील पर्यटकांमुळे गणपतीपुळे मंदिर परिसरातील हॉटेल्स व्यावसायिक, नारळपाणी स्टॉलधारक, फेरीवाले यांच्याकडे खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी होती.
पर्यटकांनी नौकानयनाचा आनंद घेतला. मंदिर परिसरात सुमारे ३० ते ४० व्यावसायिकांचे स्टॉल्स होते. दिवसभरात त्यांच्याकडून सुमारे ८० लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जयगडचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १८ पोलिस तैनात होते.












